भगवान परशुरामांच्या आई श्रीदेवी रेणुका माता यांचे मंदीर परशुराम मंदिराच्या मागे असून एकवीरा, यल्लम्मा अशा विविध नावाने भक्त रेणुकामातेची भक्ती करतात. रेणुका देवीचे पती व भगवान परशुरामांचे वडील तपस्वी जमदग्नी यांची सहस्त्रार्जुन नावाच्या राक्षसाने हत्या केली म्हणून तपस्वी परशुरामाने हाती शस्त्र घेऊन आपल्या पित्याची हत्या करणा-या सहस्त्रार्जुन राक्षसाचा वध केला व त्या राक्षसाचे शिर आपल्या आईच्या हातात आणून दिले. विदर्भकन्या रेणुका माता मराठवाड्यातील माहूरमध्ये सती गेल्या व आपले पराक्रमी आणि तपस्वी पुत्र परशुराम यांच्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी उभ्या राहिल्या.

श्री दत्त मंदिर 

महेंद्रगिरी पर्वतावर परशुराम मंदिराच्यावरील बाजूस श्रीदत्त मंदिर आहे. तेथे कुंड असुन मंदिरानजिक गुहा आहे. श्री परशुरामांचे वडील तपस्वी जमदग्नी यांच्यावरील अंत्यविधी माहूर येथे करण्यात आला. त्यासाठी श्रीदत्त गुरुंनी पौरोहित्य केले. त्यानंतर भगवान परशुरामांचे सांत्वन करण्यासाठी श्रीदत्तगुरु महेंद्र पर्वतावर आले व तेथे दत्तगुरु व श्रीपरशुराम यांची विस्तृत चर्चा झाली. या भेटीच्या जागी एका छोट्या कुंडावर उभारलेले श्री दत्त मंदीर आहे. गुरु ब्रह्मेंद्र स्वामी या मंदिरा शेजारीच एका गुहेमध्ये राहत असत.
दत्त मंदिराकडे जाताना ग्रामस्थांची नितांत श्रद्धा असलेले ग्रामदेवता धावजी महाराजांचे मंदीर आहे व त्या शेजारीच सात घरे असलेली आणि विपुल पाणी लाभलेली पेशवेकालीन विहीर आहे. तिला धावजीची विहीर असे नाव आहे. पूर्वी या विहीरीचे पाणी गावात व परशुराम मंदिरात पाटाने नेलेले आहे.

गंगामाता मंदिर

या पर्वतावर सदैव पाणी उपलब्ध रहावे म्हणून भगवान परशुरामांनी गंगामातेची प्रार्थना केली व आता जेथे कुंड आहे त्या ठिकाणी बाण मारुन संतत झरा निर्माण केला व तेथे जे तीर्थकुंड तयार झाले त्या बाणगंगेच्या काठी गंगामातेच्या मंदिराची उभारणी झाली. या कुंडातील पाणी चविष्ट आहे तसेच या कुंडातील पाणी कधीच आटत नाही. ग्रामस्थ वर्षोनूवर्षे पिण्यासाठी हेच पाणी वापरत असत. व अजुनहि अनेक ग्रामस्थ पिण्यासाठी हेच पाणी वापरतात. भगवान परशुराम यांच्या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात देवी रेणूकामाता मंदिराजवळ हे कुंड आहे. अनेक भाविक ईच्छापुर्तीसाठी या कुंडात नाणी टाकतात.

श्री धावजी मंदिर

भगवान परशुराम मंदिराच्या वाटेवर श्रीदेव धावजी मंदिर आहे. श्रीदेव धावजी हे परशुराम गावाचे ग्रामदैवत. गावाचा रक्षणकर्ता म्हणून या देवाचे विशेष महत्व आहे. श्रीदेव धावजी मंदिरात नवरात्र उत्सवात सलग नऊ दिवस जागर केला जातो. ग्रामस्थ या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. माघी पौर्णीमेला ग्रामस्थांच्या वतीने त्रैवार्षीक समा आयोजित केला जातो. या काळात तिन दिवस गावात मोठ्या प्रमाणात जत्रा असते. दर तिन वर्षांनी येणारा हा उत्सव ग्रामस्थ श्रध्देने व आपुलकीने साजरा करतात. या वेळी नजिकच्या गावातील श्रीदेव धावजी यांच्या दोन बहिणी देवी झोलाई – वालोपे व देवी गरजाई – आंबडस तसेच श्रीदेव धावजी यांच्या सुविद्य पत्नी देवी काळकाई – धामणदेवी या सर्व समा काळात देवाच्या भेटीला येत असत. आता फक्त देवी काळकाई व देवी झोलाई या दोन देवी भेटीला येतात.
धावजी मंदिरासमोरच एक मोठी विहीर आहे. या विहीरीत एकात एक सात विहीरी आहेत. 

मारुती मंदिर

परशुराम मंदिरासमोर दक्षिणाभिमुख श्री हनुमानाचे मंदीर असून हे मंदीर समर्थ रामदास स्वामींनी बांधले आहे. त्या शेजारीच मांगल्यांचे चिन्ह म्हणून गरुड राजाची छोटीशी मूर्ती आहे. गणेश दर्शन घेतल्यानंतर मंदिरात येताना प्रथम लागते ते हनुमान मंदिर. या ठिकाणी आल्यावर अनेकांना प्रश्न पडतो की येथे हनुमान मंदिर कसे. परशुराम तर आधीचा अवतार व नंतर भगवान श्रीरामांचा अवतार आणि त्यानंतर श्री हनुमानांचा जन्म झाला. मग हे मंदिर येथे कसे. पण असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
रामरक्षेमध्ये – दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजाः ।
पुरतो मारूतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम् ।।
याचा अर्थ दक्षिणाभिमुख मारूतीचे दर्शन घेऊनच रामाचे दर्शन घ्यावे असा रिवाज आहे. त्याशिवाय रामाचे दर्शन होत नाही असे मानले जाते. श्री हनुमान हे श्रीरामाकडे जाण्याचे प्रवेशव्दार आहे व म्हणूनच रामरक्षेमध्ये श्रीमत् हनुमान किलकम् असा उल्लेख आहे. किलकम् म्हणजे प्रवेशव्दार. म्हणून भाविकांना येथे भगवान परशुरामांबरोबर भगवान श्रीराम यांचे देखिल दर्शन घडावे यासाठी समर्थ रामदास स्वामींनी भगवान परशुराम मंदिरासमोर दक्षिणाभिमुख मारूतीचे मंदिर बांधले. 

श्री विठ्ठल मंदिर

परशुराम मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर श्री विठ्ठलाचे मंदिर आहे. हे मंदिर 1980 साली बांधण्यात आले. कोकणातील वारकरी सांप्रदायचे लोक या मंदिरात श्रध्देने येतात. संतांची एकादशी (मार्गशिर्ष एकादशी) या दिवशी श्री विठ्ठल परशुरामांच्या भेटीला अशी वारकऱ्यांची श्रध्दा आहे. म्हणून या दिवशी कोकणचे वारकरी परशुराम व श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी व कार्तिकी एकादशीला या देवळात उत्सव साजरा केला जातो.

श्री शंकराचे मंदिर

परशुराम मंदिराजवळच श्री शंकराचे मंदीर आहे. देवस्थान ट्रस्टने मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम नुकतेच पुर्ण केले आहे. तेथेहि बारा महिने पाणी असलेली दोन कुंड आहेत. भगवान श्री शंकर हे भगवान परशुरामांचे गुरु असल्याने या मंदिराला विशेष महत्व आहे. या मंदिरात भगवान श्री शंकरांचे स्वयंभु स्थान आहे.

श्री गणेश मंदिर

परशुराम मंदिरापासुन काही अंतरावर छोटे गणेश मंदिर असून मंदीराजवळ पाण्याची दोन मोठी कुंडं आहेत. त्यांच्या पुनर्बांधणीचे कामहि सुरू झाले आहे. येथूनच सुमारे एक किलोमीटरवर एक भव्य दीपमाळ आणि पाण्याचा मोठा धबधबा आहे. हा धबधबा सवतसडा या नावाने ओळखला जातो. सवतसडा धबधब्यापासून पाटाच्या माध्यमातून देवळात व गावात पाणीपुरवठा केला जात होता.त्या काळात अत्यंत नियोजित व रेखीव पध्दतीने पाटाची बांधणी करण्यात आली होती. तीनशे वर्षांपूर्वी काही घरांखालून सहा फूट उंचीचे बांधकाम करून पाटाने मंदिरात पाणी नेण्याची किमया गुरु ब्रह्मेंद्रस्वामींनी केली आहे.

देवी जाखमातेचे मंदिर

परशुराम मंदिराच्या बाजूला देवी जाखमातेचे मंदीर आहे. त्याच्या समोर बारा महीने वाहणारा पाण्याचा मोठा झरा असलेले तलाव (टाके) आहे. या मंदिरावर चार मिनारे आहेत यावरून हे मुस्लीम पध्दतीचे बांधकाम आहे हे सहज लक्षात येते. देवी जाखमाता ही परशुराम गावाची गावदेवी आहे. अनेक भक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. या देवीला जाखाई असेहि म्हणतात. आधीच्या काळात या देवीचे मंदिर भगवान परशुराम मंदिराच्या परिसरातील गंगामातेच्या मंदिराजवळ होते. कालांतराने ग्रामस्थांच्या आग्रहास्तव या मंदिराची स्थापना आता मंदिर ज्या जागी आहे त्या जागी करण्यात आली.

गोमाता कामधेनु मंदिर

परशुरामांच्या स्वयंभू स्थानावर आपला पान्हा सोडणा-या एका गोमातेला गुराखी मारण्यासाठी धावला असता ही गोमाता महेंद्र पर्वताच्या पायथ्याशी गुप्त झाली. तेथे आता गोमातेचे अत्यंत देखणे मंदीर उभारण्यात आले आहे. या तीर्थक्षेत्रात श्री शिवछत्रपती, राजे संभाजी व राजाराम राजे यांनी अनेकदा मुक्काम करुन भगवान परशुराम यांची यथासांग पूजा केल्याचे कागदपत्र उपलब्ध असून कित्येक शतके परशुराम जयंती व शिवजयंती अक्षयतृतीयेला एकत्र साजरी केली जाते.
तीनशे वर्षांपूर्वी सध्या महेंद्र पर्वतावर जे परशुराम गाव आहे तेथे त्या काळात वस्ती नव्हती तर नदीकाठी म्हणजे आजच्या पेढे गावात शेतक-यांची शेती व वस्ती होती. तेथील शेतकरी आपली गुरे चारण्यासाठी महेंद्र पर्वतावर पाठवीत. घरातील मोठी माणसे शेती उद्योगात असत तर मुलांना गुरे घेऊन पाठविले जाई. एका गुराख्याची एक गाय कित्येक दिवस दूध देत नसे. हा मुलगा दूध पितो किंवा काय असा घरातील माणसांना संशय आला. त्या गुराख्याने चरणा-या गाईवर नजर ठेवली. ती एका ठिकाणी येऊन आपला पान्हा सोडते हे पाहिल्यावर तो गुराखी रडत रडत घरी गेला. त्याने आपल्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. आई-वडील व अन्य शेजारी-पाजारी आज परशुरामांचे मंदिर आहे तेथील गवत व जंगलात आले. गाईने पान्हा सोडलेले ठिकाण त्यांनी पाहिले. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. थोडी साफसफाई केल्यावर त्यांना येथे स्वयंभूस्थानाची एक छोटीशी शिळा दिसली आणि हे देवाचे स्थान आहे अशी श्रद्धा त्यांच्या मनात निर्माण झाली.
त्यापूर्वी गाय पान्हा सोडते हे पाहिल्यावर छोट्या गुराख्याने गाईचा पाठलाग केला व काही अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी गाय अदृश्य झाली. गुराख्याच्या आई-वडिलांनी ते ठिकाण पाहिले आणि गाय अदृश्य झाली त्या ठिकाणी त्यांनी छोटेसे खोपट उभारले. 

सिद्धीविनायक मंदिर

गुरु ब्रह्मेंद्रस्वामींनी परशुराम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली तेव्हा शास्त्रानुसार श्री गणेशाची स्थापना केली. हा गणेश सिध्दी विनायक असून या गणेश मंदिराच्या उभारणीच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, संभाजीराजांचे सुपुत्र सातारचे छत्रपती शाहुमहाराज राणीसाहेबांसह उपस्थित होते. श्री गणेशाची ही देखणी मुर्ति संगमरवरी आहे. गणेशोत्सव कालावधीत दर्शनासाठी भक्तांची रिघ लागलेली असते.
श्री गणेशाचे आधी स्मरण केले जाते. कोणतेही कार्य करताना शास्त्राने गणेश पुजन सांगितले आहे.
कार्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा ।
संग्रामे संकटेचैव विघ्नस्तस्य न जायते ।।
ही आपली परंपरा आहे. श्री गणेश सर्व विघ्नांचा नाश करणारा, ही,ही आपली परंपरा आहे. श्री गणेश ही सर्व विघ्नांचा नाश करणारी व बुध्दीची देवता आहे. म्हणून प्रथम त्यांचे दर्शन घ्यावे.