Mobirise

लायब्ररी व डिस्पेंसरी

वानप्रस्थाश्रम जवळच एक लायब्ररी व वैद्यकीय सेवाकक्ष या वास्तू उभारण्यात आल्या आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या तसेच वानप्रस्थाश्रम मधील रहिवाशी व ग्रामस्थांच्या सेवेसाठी वैद्यकीय सेवाकक्ष व वाचन प्रेमींसाठी लायब्ररी जेथे इतर पुस्तकांबरोबर भगवान परशुराम यांच्या जिवन कार्यावरील पुस्तके येथे उपलब्ध असतील.

Mobirise

सांस्कृतीक भवन

सांस्कृतीक भवन – परशुराम मंदिरामध्ये येणाऱ्या अनेक भाविकांची अशी मनोकामना असते की आपल्या घरातील एखादे धार्मिक कार्य मंदिरामध्ये करता यावे जसे की लग्न, मुंज, हवन, ईत्यादी. तसेच मंदिरात होणारे अनेक छोटे मोठे कार्यक्रम, विधी भाविकांना करता यावेत या हेतुने व भक्तगणांच्या भावना लक्षात घेऊन संस्थान श्री भार्गवराम परशुराम यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सांस्कृतीक भवन बांधायचा निर्णय घेतला. सांस्कृतीक भवनाचे बांधकाम सुरू असुन लवकरच भाविकांसाठी ते उपलब्ध होईल. या भवनामध्ये 1000 माणसे एकावेळी बसतील अशी सोय आहे. भाविकांना परवडेल अशा अल्प दरात भवन उपलब्ध होईल. देवस्थानच्या वतीने धार्मिक विधी करण्यासाठी भटजी व इतर गोष्टींचीहि सोय केली जाईल. तसेच जेवणाची सोय देखील याच दालनात उपलब्ध असेल. सर्व सोयींनी सुसज्ज व सर्वांगाने परीपूर्ण अशी ही इमारत असुन लवकरच ती सर्वांसाठी उपलब्ध होईल.

Mobirise

वानप्रस्थाश्रम

मंदीर परिसरात महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी वानप्रस्थाश्रम मंजूर केला असून त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. येथे 40 ज्येष्ठ स्त्री – पुरूषांची निवास, भोजन आदी व्यवस्था लवकरच केली जाईल. आयुष्याची संध्याकाळ भगवान परशुरामांच्या परिसरात तृप्त मनाने घालवावी अशी भावना असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना येथे प्रवेश दिला जाईल. मनाला प्रसन्न वाटेल असे वातावरण व निखळ शांतता असलेले हे ठिकाण आहे. वानप्रस्थाश्रमजवळ एक ग्रंथालय व वैद्यकीय सेवाकक्ष कार्यरत रहाणार आहे. वानप्रस्थाश्रम, भक्तनिवास, ग्रंथालय या वास्तू मंदिरालगत अत्यंत रम्य ठिकाणी असून वाशिष्ठी नदी व चिपळूण शहराचे आनंददायी दर्शन या वास्तूंमधून होऊ शकते. सर्व भक्तगणांनी या उपक्रमाला भरगोस अर्थसहाय्य केले तर वानप्रस्थाश्रमातील निवास व भोजन आदि सुविधा सर्वांसाठी विनाशुल्क ठेवाव्यात असा विशवस्त समितीचा प्रयत्न आहे.

Mobirise

कर्मचारी निवास

मंदिराच्या सेवेत सध्या स्थानिक रहिवाशांना काम दिले गेले आहे. शासनाच्या योजनेतून आता संस्थेचे एक सुसज्ज कार्यालय उभारले गेले आहे. या कार्यालयात काम करण्यासाठी स्थानिक माणसे मिळणे अवघड आहे. तसेच व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, जनसंपर्काचा अनुभव असलेले कर्मचारी या छोट्याशा गावात मिळणे शक्य नसल्यामुळे बाहेरून येणा-या कर्मचारी वर्गासाठी निवासाची सोय करण्याकरिता कर्मचारी निवासाची उभारणी केली जात आहे. मे अखेर यातील पहिला टप्पा पुर्ण होईल.
सध्या अनेक ठिकाणी कामाचा अनुभव घेतलेल्या निवृत्तांना निवृत्तीनंतरचे आयुष्य धार्मिक, सामाजिक क्षेत्रात घालवावे असे वाटत असल्याचा विश्वस्त समितीचा अनुभव आहे. आम्हाला पुरेसे निवृत्ती वेतन मिळते. 10-20 वर्षे काम करण्याची क्षमताहि आहे. निवासाची सोय झाल्यास आम्ही वेतन घेऊन किंवा विनावेतन देवस्थान कार्यालयात, वानप्रस्थाश्रम, ग्रंथालय किंवा अन्य एखाद्या विभागात सेवा भावनेने काम करू असे सुचविणारे अनेक दुरध्वनी येतात. या सर्वांसाठी कर्मचारी निवासस्थान उपयुक्त ठरणार आहे. 

Mobirise

गोशाळा

तीनशे वर्षांपूर्वी सध्या महेंद्र पर्वतावर जे परशुराम गाव आहे तेथे त्या काळात वस्ती नव्हती तर नदीकाठी म्हणजे आजच्या पेढे गावात शेतक-यांची शेती व वस्ती होती. तेथील शेतकरी आपली गुरे चारण्यासाठी महेंद्र पर्वतावर पाठवीत. घरातील मोठी माणसे शेती उद्योगात असत तर मुलांना गुरे घेऊन पाठविले जाई. एका गुराख्याची एक गाय कित्येक दिवस दूध देत नसे. हा मुलगा दूध पितो किंवा काय असा घरातील माणसांना संशय आला. त्या गुराख्याने चरणा-या गाईवर नजर ठेवली. ती एका ठिकाणी येऊन आपला पान्हा सोडते हे पाहिल्यावर तो गुराखी रडत रडत घरी गेला. त्याने आपल्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. आई-वडील व अन्य शेजारी-पाजारी आज परशुरामांचे मंदिर आहे तेथील गवत व जंगलात आले. गाईने पान्हा सोडलेले ठिकाण त्यांनी पाहिले. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. थोडी साफसफाई केल्यावर त्यांना येथे स्वयंभूस्थानाची एक छोटीशी शिळा दिसली आणि हे देवाचे स्थान आहे अशी श्रद्धा त्यांच्या मनात निर्माण झाली.
त्यापूर्वी गाय पान्हा सोडते हे पाहिल्यावर छोट्या गुराख्याने गाईचा पाठलाग केला व काही अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी गाय अदृश्य झाली. गुराख्याच्या आई-वडिलांनी तेही ठिकाण पाहिले आणि स्वयंभू स्थानापाशी व गाय अदृश्य झाली त्या ठिकाणी त्यांनी छोटेसे खोपट उभारले व दररोज सकाळी स्वयंभू स्थानावर पाणी घालून फुले वाहण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. भगवान परशुरामांच्या स्वयंभुस्थानावर रोज आपला पान्हा सोडणाऱ्या गोमातेची आठवण म्हणुन तसेच गोमातेची सेवा करण्यासाठी व भाविकांच्या दर्शनासाठी गोशाळेची उभारणी सुरू आहे.
या द्वारे सर्व भाविकांना गोमातेच्या दर्शनाचा लाभ घेता येईल व सेवा करता येईल.

Mobirise

परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी

परशुरामांचा अवतार काही हजार वर्षांपूर्वी झाला असावा. संपूर्ण देशभर संचार असलेले श्रीविष्णूंचे ते एकमेव अवतार आहेत. ते चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या मूर्तीच्या दर्शनाने मन प्रसन्न होते पण हा पौराणिक ठेवा जतन करण्याचे काम तीनशे वर्षांपूर्वी परमहंस ब्रह्मेंद्रस्वामींनी केले. परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी हा एक ऐतिहासिक चमत्कार आहे. बीड जिल्ह्यातील दुधडवाडी हे त्यांचे गाव. त्यांचे मूळ नाव विष्णुपंत कुलकर्णी त्यांचे वडील भिक्षुकी करीत असत. त्यांच्याकडेहि अठरा विश्व दारिद्र्य होते. विष्णुची मुंज झाली आणि १६५७ च्या सुमाराला त्यांचे आईवडीलहि निवर्तले. अध्यात्म्याची आवड असलेल्या विष्णू कुलकर्णीनी राजुर येथील गणेश मंदिरात चिंतन व तपश्चर्या केली. त्याच सुमाराला औरंगाबादजवळ दौलताबाद येथे ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाने मंदिरांचा विध्वंस सुरु केला होता. काशी विश्वेश्वराचे व त्या पाठोपाठ मथुरेचे केशव मंदीर त्यानी उध्वस्त केले होते. मराठवाड्यातहि हा विध्वंस सुरु झाला होता. राजुर येथे सुमारे बारा वर्षे तपश्चर्या केल्यावर विष्णुपंत कुलकर्णी काशीला गेले. तेथे ज्ञानेंद्र सरस्वतींजवळ त्यांनी अध्ययन केले आणि पुन्हा गावी येऊन तीर्थाटन सुरु केले. गोदावरीच्या काठाने ब्रह्मेंद्रस्वामी तीर्थाटन करीत असताना भगवान परशुराम महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत आहेत असा दृष्टांत त्यांना झाला असे मानण्यात येते. 

स्वामींनी थेट रामेश्वरपर्यंत यात्रा केली आणि परतीच्या प्रवासात ते चिपळूणजवळच्या धामणी या गावी म्हणजे आजच्या परशुराम क्षेत्रात आले. स्वामींनी तेथे एका गुहेमध्ये तपश्चर्या केली. त्याचवेळी अनेक औषधी वनस्पतींचे संशोधनहि केले. जंजि-याचा नबाब त्या काळात धामणी व परिसरात जुलुम जबरदस्ती करीत होता. छत्रपति राजाराम महाराज या सिद्दीशी संघर्ष करीत होते. स्वामींनी राजाराम महाराजांना सर्व प्रकारची मदत केली आणि सिद्दीवरहि मोठा प्रभाव पाडला. धनाजी व संताजी भोसले या दोन योद्धांची त्यांनी सिद्दीकडून मुक्तता करून घेतली. त्याचवेळी कान्होजी आंग्रे हेहि स्वामींचे भक्त झाले. पुढे हेच कान्होजी आंग्रे भारताचे पहिले नौदल प्रमुख म्हणजे सरखेल झाले. स्वामींनी त्यांना त्या काळात संगमेश्वरजवळ युद्धनौका बांधण्यासाठी चौ-याहत्तर हजार रुपये दिल्याची इतिहासात नोंद आहे. राजाराम महाराजांनी धामणी जिंकली व ती स्वामींना इनाम दिली. १७०७ मध्ये औरंगजेबाने छत्रपति शाहु महाराजांची म्हणजे शिवाजी महाराजांच्या नातवाची व संभाजीराजांच्या पुत्राची तुरुंगातून सुटका केली. स्वामींनी चंदनवंदन किल्ल्यावर असलेल्या शाहु महाराजांना कटीसूत्र (करगोटा) व कौपिन भेट म्हणून पाठविले. त्याच सुमाराला सिद्दी कासमचा मृत्यु झाला व सिद्दी सुरुर ऊर्फ बडेखान जंजि-याच्या सत्तेवर आला. तोहि स्वामींचा भक्त होता. त्यानी पेढे व आंबडस ही दोन गावे स्वामींना इनाम दिली. स्वामींना धामणी येथे आल्यापासून पहिला शिष्य भेटला तो बाळा गवळी. तो त्यांना फळे आणून देई व सर्वे कामेहि करी.

        स्वामींनी गुहेत राहून छोट्याशा परशुराम मंदिरात पूजा-अर्चा, तपश्चर्या सुरु केली होती. १७०८ मध्ये त्यांनी अगदी छोट्याशा असलेल्या परशुराम मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात केली. हे काम तब्बल दहा वर्षे चालले कारण काम महेंद्र पर्वतावरचे म्हणजे उंच डोंगरावरचे. तेथे चिरे नेणेहि अवघड. कामगार मिळणेहि अशक्य त्यामुळे दहा वर्षाच्या या कालावधीत राजराजेश्वर परशुरांचे प्रतिनिधी म्हणून हत्ती, घोडे, अब्दागीर यांचा ताफा बरोबर घेऊन स्वामी थेट दक्षिण भारतापर्यंत तीर्थयात्रेला जात. त्या मार्गावर शेकडो संस्थाने होती. सर्वत्र स्वामींचे स्वागत होई. मोठ्या प्रमाणात मोहोरा व द्रव्य मिळे. स्वामी परत आल्यावर मंदिराचे काम जोमाने सुरु होई. छत्रपती शाहू महाराज हे स्वामींचे शिष्य होते. ते व राणीसाहेब अनेकदा मेण्यात बसून साता-याहून परशुरामला दर्शनासाठी व आशिर्वादासाठी येत. स्वामींनी आज दिसणारे परशुराम मंदिर उभारले. त्यासाठी नेहमीच्या चि-यांच्या चौपट आकाराचे चिरे त्यांनी तीनशे वर्षांपूर्वी एवढ्या उंचीवर आजच्या मंदिराच्या ठिकाणी कसे नेले ही कल्पनाही थक्क करणारी वाटते. स्वामींनी १७१८ पर्यंत परशुराम मंदिर पूर्ण केले. त्यापूर्वी त्यांनी शेजारीच सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले. सातारचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज त्यावेळी उपस्थित होते. मारुती मंदिर, रेणुकामातेचे मंदिर, बाणगंगा, गंगामातेचे मंदिर हे सर्व संकुल स्वामींनी पूर्ण केले. यात्रेकरुंसाठी धर्मशाळा बांधल्या. थोड्या अंतरावर परशुरामांचे गुरु असलेल्या व स्वयंभू स्थान असलेल्या श्री शंकराचे मंदिर बांधले. तेथे असलेले बारमाही पाणी त्यांनी पाटाने मंदिर परिसरात आणले. जेथे दत्तगुरु व परशुरामांची भेट झाली, त्या स्थानावर त्यांनी एका छोट्याशा तलावावर दत्तमंदिर उभारले. परशुराम मंदिराजवळ सहा दीपमाळा बांधल्या. नगारखाना उभारला. या सर्व बांधकामांना तीनशे वर्षांपूर्वी म्हणजे १७०८ ते १७१८ या कालावधीत एक लाख रुपये खर्च झाल्याची नोंद स्वामींच्या जमाखर्चात आहे. श्री.काका तांबे हे स्वामींचे व्यवस्थापक होते. त्यांच्या हस्ताक्षरातहि या पूर्ण जमाखर्चाची नोंद आहे. स्वामींना सर्व व्याप सांभाळणारा एक व्यवस्थापक हवा होता. जंजि-याच्या सिद्दीने श्री. तांबे यांना त्यांच्याकडे पाठविले.
        श्री ब्रम्हेंद्रस्वामी परशुराम क्षेत्री एका गुहेमध्ये रहात आणि एकाच वेळी जंजि-याच्या सिद्दी व साता-याचे शाहू महाराज यांच्याशी समन्वय ठेवीत. सिद्दीसात हा जंजि-याचा नबाब क्रूर होता. त्याच्या उत्पन्नाच्या वसुलीचे काम पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ याच्या भावाकडे दिलेले होते. वसुलीमध्ये थकबाकी राहिली म्हणून सिद्दीने त्याला देहदंड दिला हे पाहिल्यावर भीतीपोटी बाळाजी विश्वनाथ श्रीवर्धन बंदरात एका जहाजात लपला. तीन दिवस उपाशी पोटी राहून तो गोवळकोट बंदरात उतरला. घाबरलेल्या त्या तरुणाला पाहून तेथील खलाशांनी त्याला समोरच्या परशुराम मंदिरात ब्रह्मेंद्र स्वामींकडे आश्रयाला जा असा सल्ला दिला. बाळाजी विश्वनाथ परशुराम येथे जाऊन स्वामींना शरण गेला. स्वामींनी त्याला दोन-तीन दिवस ठेवून घेतले. स्वामींनी त्याची हुषारी पाहून, हा मुलगा चुणचुणीत आहे दरबाराच्या कामात उपयोगी पडेल असे वाटते त्याला ठेवून घ्यावे असे महाराजांसाठी पत्र दिले. दोन वर्षे दरबारात काम केल्यावर बाळाजी विश्वनाथाने कोल्हापूरच्या गादीशी एकनिष्ठ असलेल्या कान्होजी आंग्रेना साता-याला शाहु महाराजांपुढे प्रविष्ट केले व हीच खरी शिवछत्रपतींची गादी आहे असे सांगत कान्होजी आंग्र शाहुमहाराजांकडे रुजू झाले आणि बाळाजी विश्वनाथला महाराजांनी पहिला पेशवा म्हणून मानाची वस्त्रे दिली. त्यानंतर बाजीराव, चिमाजीअप्पा, सर्व पेशवे ब्रह्मेंद्र स्वामींचे शिष्य झाले. ब्रह्मेंद्र स्वामी त्यांना युद्ध व स्वा-या करण्यासाठी लागेल तेवढा पैसा देत आणि तो व्याजासकट वसूलहि करीत. स्वामींनी परशुराम क्षेत्री भरपूर पाणी असावे म्हणून बाणगंगा, धावजी मंदिराजवळ असलेली सात फे-यांची विहीर, दत्त मंदीर व शंकर मंदिरापासून आणलेले पाट ही व्यवस्था तर केलीच पण मुंबई – गोवा मार्गावर जो सवतसडा दिसतो त्याच्या पलिकडे एक मोठे धरण बांधले आणि चार किलोमीटर लांबीचा पाट मंदिरापर्यंत आणला. या पाटाचा काही भाग काही घरांच्या खालून आहे व त्याच्या दोन्ही बाजूला सहा फुटाहून अधिक उंचीच्या भिंती आहेत. पाटाच्या सफाईसाठी एक मशालजी व एक सफाईवाला या दोघांनाहि उभे राहून चालता यावे यासाठी ही सोय आहे.
        ब्रह्मेंद्र स्वामींनी परशुरामांच्या पूजाअर्चेसाठी महेंद्र पर्वतावर काही पुजारी आणले. धार्मिक कार्य करण्यासाठी काही ब्राह्मण कुटुंबे आणली. इनाम गावातील परशुरामाचा वसूल करण्यासाठी काही कुटुंबे आणली. मजुरी करण्यासाठी काही कुटुंबे आणून त्यांची वसाहत केली. गाव म्हणून आवश्यक असलेली नाभिक, सुतार सोनार आदि कुटुंबेहि त्यांनी आणली. देवस्थानाला इनाम मिळालेल्या पेढे, परशुराम, आंबडस, नबाबाने इनाम दिलेल्या रायगडातील टोळ हि गावे आहेत यातून शेकडो खंडीभात व कित्येक खंडी कडधान्य मिळे. देवसेवेत असलेल्या सर्वांना या उत्पन्नाचा भाग स्वामी देत त्यामुळे सर्वांचा चरितार्थ चाले. शेती करणा-यांना त्यांचा वाटा मिळे. उत्पन्न वसूल करणा-या खोत मंडळीला त्यांचा हिस्सा मिळे व देवस्थानलाहि धर्मकार्यासाठी मोठे उत्पन्न शिल्लक राही.भगवान परशुरामांचे चरित्र पौराणिक आहे व ते नितांत श्रध्देवर अवलंबून आहे परंतु भगवान परशुराम जेथे चिरंजीव अवतार म्हणून तपश्चर्या करतात त्या परशुराम क्षेत्राची निर्मिती व उभारणी तीनशे वर्षांपूर्वी महेंद्र पर्वतावर आलेल्या बीड जिल्ह्यातील विष्णु कुलकर्णींनी म्हणजे परमहंस ब्रह्मेंद्रस्वामींनी केली हा इतिहासाचा भाग आहे. ब्रह्मेंद्र स्वामींची शेकडो हस्तलिखित मराठी व मोडी पत्रे उपलब्ध आहेत. त्यांच्या जीवन चरित्रावर काही अभ्यासकांनी प्रबंध लिहिले आहेत. शिवछत्रपतींनंतर चाळीस वर्ष हिंदवी स्वराज्य जिद्दीने उभे रहाण्यासाठी या विष्णुपंत कुलकर्णींनी म्हणजे परमहंस ब्रह्मेंद्रस्वामींनी आत्यंतिक श्रध्देने व विश्वासाने शक्य ते सर्व सहकार्य केले हे नाकारता येणार नाही.
        शाहु छत्रपतींप्रमाणेच आम्हीही तुमचे भक्त आहोत पण युद्धाच्या काळात आपण पक्षपातीपणा करुन शाहु छत्रपतींना मदत करता असा आक्षेप जंजि-याचा सिद्दी अधूनमधून घेत असे. एकदा तर त्यानी परशुरामावर हल्ला केला व मंदीर पाडून द्रव्य लुटून नेले. नंतर स्वामींच्या भीतीपोटी सिद्दी शरण आला. स्वामींना द्रव्य व दागिने परत देऊ लागला पण स्वामींनी ते नाकारले व मंदीर पुन्हा उभारले. स्वामींना प्रदीर्घ आयुष्य लाभले. १६४९ साली मराठवाड्यातील दुधवाडीत त्यांचा जन्म झाला व २६ जुलै १७४५ रोजी त्यांनी कृष्णेच्या काठावर समाधी घेतली. शहाण्णव वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य स्वामींना लाभले. जंजि-याचा नबाब त्रास देतो, साता-याहून परशुरामला मेण्यातून येणे वयोमानाप्रमाणे अवघड वाटते व स्वामींचेहि वय झाले आहे म्हणून स्वामींनी साता-याला यावे व तेथेच रहावे अशी विनंती छत्रपती शाहूंनी केली. स्वामींनी वयाच्या बहात्तराव्या वर्षी साता-याला प्रयाण केले. छत्रपतींनी त्यांना धावडशी, वीरमाडे व आनेवाडी ही गावे इनाम दिली. स्वामींनी धावडशी येथे प्रतिपरशुराम देवस्थान वाटावे असा परिसर उभा केला. धावडशीच्या मंदिरासाठी त्या काळात दोन लाख खर्च झाले. त्यांनी जवळच चार हजार फूट उंच डोंगरावर बांधलेले मेरू लिंगाचे मंदीर हाहि एक चमत्कार आहे. धावडशीत मुक्कामाला असताना स्वामींनी सोलापुरात माळाशिरसमध्ये भुलेश्वर मंदीर बांधले. आपल्या गावाजवळ थेट राजुरमध्येहि त्यांनी मंदीर उभारले. काही मशिदीही बांधल्या. आजच्या रोजगार हमी योजनेप्रमाणे दुष्काळी भागात ग्रामस्थांना मजुरी देऊन स्वामींनी अनेक तलाव बांधून घेतले. आजच्या वनीकरणाप्रमाणे स्वामींनी महाराष्ट्रात स्वतः मजुरी देऊन वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली. अनेक ठिकाणी घाट बांधले, रस्ते केले, ज्या काळात सिमेंट नव्हते त्या काळात त्यांनी बांधलेल्या इमारती आज भूकंपातहि मजबूतपणे उभ्या आहेत. त्या काळात स्लॅबसाठी बांधकामाचे चिरे वापरले गेले आहेत व ते स्लॅब आजहि भक्कम आहेत. स्वामींनी तीनशे वर्षांपूर्वी दुष्काळात उपासमार टाळावी म्हणून पहिली सहकारी संस्था उभी केली. परशुराम देवस्थानाचा पौराणिक काळातील व इतिहासातील मागोवा घ्यायचा तर भगवान परशुरामांचे भक्त असलेल्या व हे देवस्थान उभारणा-या, बीडहून आलेल्या परमहंस ब्रह्मेंद्र स्वामींची माहिती घेणे आवश्यक आहे कारण ते या देवस्थानचा अविभाज्य भाग आहेत. ब्रह्मेंद्र स्वामी या महेंद्र पर्वतावर आले नसते तर श्रीपरशुराम येथे तपश्चर्या करतात हे कोणाला समजलेहि नसते व अपरान्त भूमीचा निर्माता भगवान परशुराम यांचे दर्शन घेण्याचे, त्यांच्याकडून शक्ती व प्रेरणा घेण्याचे भाग्यहि लक्षावधी भाविकांना मिळू शकले नसते. या मंदिरातील मूर्ती शस्त्र सज्ज परशुरामांच्या नाहीत कारण युद्ध व संघर्ष हा त्या अवताराचा एक अपरिहार्य भाग होता. चिरंजीव असल्याने काळावर व निरासक्त असल्यामुळे काम विकारावर विजय मिळविलेले परशुराम अशा त्रिमुर्ती या मंदिरात आहेत. स्वामींनी स्थापन केलेली पहिली मूर्ती सिंहासनाधिष्ठित होती. सिद्दीच्या हल्ल्यानंतर स्वामींनी त्या मूर्तीचे चिपळूणच्या गांधारेश्वराच्या डोहात विसर्जन केले व पूर्ण आकाराची नवी त्रिमुर्ति मंदिरात स्थापन केली. पंचामृती पूजा व अन्य कारणांमुळे या मूर्तीमध्ये अनेक दोष निर्माण झाले म्हणून १९९४ साली विश्वस्त समितीने तेथे नव्या मूर्ति स्थापन केल्या मात्र पूर्वीच्या मूर्ति जतन करुन ठेवल्या आहेत. रेणुका मातेची मूर्तीहि त्याचवेळी नव्याने स्थापन करण्यात आली. अग्निहोत्राचे प्रचारक सोलापूरचे अॅड. अत्रे यांच्याकडून या मूर्ती श्रद्धास्थान म्हणून भेट देण्यात आल्या आहेत.