देशभरातील निवडक स्थाने
प्रभू रामचंद्राने उत्तर –दक्षिण भारत जोडला, तर भगवान श्रीकृष्णाने पूर्व- पश्चिम भारत एकमेकांना जोडला, असे म्हटले जाते, पण त्यापूर्वी काही हजार वर्षे भगवान परशुरामांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि काश्मिरपासून अरूणाचलपर्यंत संपूर्ण भारत आपल्या कार्यकर्तृत्वाने सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध केला होता.
देशभर पसरलेली परशुरामांची मंदिरे आणि ठाणी पाहिल्यानंतर परशुराम हे राष्ट्रीय एकतेचे पहिले प्रतीक ठरते म्हणूनच आपण देशभरातील काही निवडक परशुराम स्थानांची माहिती घेणार आहोत. त्याची सुरुवात हिमालयापासून दक्षिणेकडे अशी करू.
१. निरमुंड – निरमुंड हे हिमालयाच्या अंतर्भागातील परशुरामांचे सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. याच ठिकाणी पित्याच्या आज्ञेने परशुरामांनी माता रेणुकेचा शिरच्छेद केला म्हणून या स्थानाला निरमुंड या नावाने ओळखले जाते. हे स्थान सिमल्यापासून हिमालयाच्या अंतर्भागात सुमारे २०० कि. मी. अंतरावर आहे. या स्थानी अनेक मंदिरे असून शेवटच्या पर्वतात गावाच्या मध्यभागी परशुराम मंदिर आहे. या चौसोपी मंदिराचे बांधकाम लाकडात कलाकुसर करून केले आहे. हे मंदिर कांगडा स्थापत्यशैलीत बांधले असून शिखर पिरॅमिडला म्हणजे प्रस्तरावरोहण पद्धतीचे आहे. मंदिरात तटबंदी, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना असून परशुरामांची प्लॅटिनमची मूर्ती आहे. या मूर्तीवर हिरे, माणके, पाचू, प्रवाळ आणि मोती अशी पंचरत्नांची मढाई होती. ही मूर्ती चोरीला गेली आणि पुन्हा सापडली, तेव्हा पंचरत्ने मात्र गायब झाली होती. याच मंदिरात उमा- महेश्वर आणि श्रीविष्णु-लक्ष्मी यांच्याही मूर्ती आहेत.या गावाजवळच परशुरामांचा महाल आहे. दगडी तटबंदी असली, तरी संपूर्ण महाल आणि प्रवेशद्वार मात्र लाकडी आहे. यज्ञ किंवा हवन करण्यासाठी स्वतंत्र भोंडा मंडप आहे. आजही येथे परशुराम जयंतीला यज्ञ होतो, तेव्हा १५ -२० हजार भाविक जमतात. महालामागच्या टेकडीवर आजही परशुरामाचे वंशज राहतात. परशुराम मंदिर आणि वंशजांची टेकडी, यामध्ये खोल दरी आहे. दोराच्या साह्यानेच ही दरी पार करावी लागते. या दरीवर डिस्कव्हरी वाहिनीने २००५ मध्ये एक लघुपट केला होता. वैशाख शुद्ध तृतीयेला परशुराम जयंतीनिमित्त निरमुंड येथे सर्वांत मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी तिबेट, भूतान, नेपाळ, चीन आणि हिमालयातील सर्व राज्यांतून लाखो भाविक येतात. ही यात्रा दीड महिना सुरू असते. निरमुंड येथे असलेल्या परशुराम कुंडात श्राद्ध, तर्पण, पिंडदान केल्याने मृतात्मा कायमचा मुक्त होतो, अशी श्रद्धा आहे.
२. रेणुकागिरी ग्राम – हिमाचल प्रदेशातील परशुरामांचे हे स्थान उत्तरेला अतिदुर्गम भागात तिबेटच्या सीमेलगत आहे. चंदीगढ आणि अंबाला येथून रेणुकागिरी ग्रामसाठी थेट बसची व्यवस्था आहे. या ठिकाणी पोचण्यापूर्वी तिबेटच्या सीमेवर कौरिक नावाचे एक लहानसे गाव लागते. तेथे परशुरामांची एक छोटीशी घुमटी आहे. हिमालयात लाहूलस्थिती जवळ हिडिंबा टेंपलजवळ हे स्थान आहे. त्याला नहान असे म्हटले जाते. तेथून पुढे गेल्यावर रेणुकागिरी ग्रामचा विशाल परिसर लागतो. गावाच्या वेशीवरच परशुरामाची १० फूट उंच द्विहस्ती बलदंड मूर्ती आपले स्वागत करते.
रेणुकागिरी ग्रामचा हा पूर्ण परिसर एखाद्या बशीसारखा आहे. उंच उंच पर्वत आणि घनदाट अरण्यातून ६ कि.मी. प्रदक्षिणेचा मार्ग जातो. या मार्गावर परशुरामांचा स्पर्श झालेली अनेक स्थाने आहेत. यामध्ये परशुरात ताल सरोवर, रेणुका मूर्ती, रेणुका ताल, दशावतार मंदिर, तपेका टीला (इथेच परशुरामांनी तपश्चर्या केली), सहस्त्रधारा आणि अभयारण्य आहे. त्यामधील एका उंच शिखरावर परशुरामांची लहानशी पण सुहास्यवदन अशी मुर्ति आहे. या पर्वताच्या पायथ्याशी रेणुकामातेने जलसमाधी घेतली, ते तळेहि आहे. दशावतार उद्यानात सर्व दहा अवतारांच्या गारेच्या रेखीव मूर्ती आहेत. पर्यावरण दृष्ट्या हिमाचल प्रदेशचा हा आदर्श प्रकल्प आहे.
३. परशुराम कुंड – ईशान्य भारतातील अरूणाचल प्रदेशात चीन आणि ब्रह्मदेशच्या सीमेवर लोहित नदीपात्रात हे स्थान आहे. उत्तर आसाममधील तिनसुखिया शहरापासून २० कि.मी. अंतरावर हे स्थान आहे. रेणुका मातेचा शिरच्छेद केल्यानंतर परशुरामांच्या हातातील परशु त्यांच्या हाताला तसाच घट्ट चिकटून बसला. तो काही केल्या हातापासून वेगळा होईना. मातृवधाचे पापक्षालन करण्यासाठी परशुरामांनी लोहितनदीवरील या स्थानी येऊन आपला परशु त्या नदीत बुडवावा अशी आकाशवाणी झाली. त्याप्रमाणे हिमाचल प्रदेशातील निरमुंड येथून परशुराम या स्थानी येऊन पोचले आणि त्यांनी आपला परशु लोहित नदीत बुडविला. तरीहि तो हातून सुटेना म्हणून त्यांनी तो परशु नदीच्या मध्यभागी प्रचंड वेगाने आपटला. तेव्हा परशु हातातून सुटला जिथे तो आपटला तिथे मोठा डोह तयार झाला. परशु आपटण्याचा वेग आणि शक्ती इतकी प्रचंड होती की आजूबाजूची पर्वत हादरले आणि त्यातून भुकंपसदृश हालचाली होऊन कुंडाजवळच परशूच्या आकाराचा एक पर्वतसमूह तयार झाला अशी कथा विविध पुराणांतून सांगितली आहे.
परशुरामकुंडाचे परीघक्षेत्र २ हजार फूट असून कुंडाचा व्यास १५० फुटांचा आहे. कुंडातील पाण्याच्या खोलीचा अंदाजच करता येत नाही. परशुरामांनी तो रक्तलांछित परशु या कुंडात आपटल्यामुळे लोहित नदीच्या पाण्याचा रंग लाल झाला असे समजले जाते. या स्थानाचे महात्म्य कुंडाशीच संबंधित आहे. त्यामुळे तेथे प्राचीन काळी परशुराम मंदिर होते की नाही याचा उल्लेख मिळत नाही. हा संपूर्ण प्रदेश प्रचंड मोठ्या भूकंपाचा असल्यामुळे असे मंदिर असले, तरी ते निसर्गाच्या प्रकोपात नष्ट झाले असावे, असे मानले जाते, परशुराम कुंडाजवळ अलीकडे म्हणजे १९७२ मध्ये परशुरामांचे एक देखणे मंदिर उभे राहिले आहे. त्यात परशुरामांची साडेचार फूट उंचीची व्दिहस्ती मूर्ति आहे.
परशुरामांनी आपला रक्तलांछित परशु इथल्या कुंडात मकर संक्रांतीला धुतला, असे मानले जाते त्यामुळे प्रत्येक मकर संक्रांतीला येथे लाखोची यात्रा भरते. यात्रेसाठी अरूणाचल सरकारने कुंडाजवळ निवास व अन्न व्यवस्था उभ्या केल्या आहेत. या कुंडात स्नान केल्यास श्राद्ध, तर्पणादि विधी केल्यामुळे सर्व पापांचे क्षालन होते.
४. करुक्षेत्र – हरियाणातील कुरुक्षेत्र प्रसिद्ध आहे. ते कौरव पांडवांच्या महायुद्धासाठी. या कुरुक्षेत्र परिसरातच पाच मोठी सरोवरे असून त्यातील ब्रह्म सरोवर हे परशुरामांशी संबंधीत प्राचीन स्थान आहे. अलिकडे हे ब्रह्म सरोवर फरसबंदीने बांधून काढले असून ते २ कि. मी. लांब आणि १ कि. मी. रुंद आहे. महाभारत युद्धानंतर या युद्धात धारातीर्थी पडलेल्या नातेवाईक आणि सैनिकांचे तर्पण युधिष्ठिराने केले आहे.
या ब्रह्मसरोवराच्या समोरच दक्षिणाभिमुख असलेली भव्य परशुराम धर्मशाळा आहे. तेथे निवासासाठी २५० खोल्या आहेत. या धर्मशाळेच्या मध्यभागी परशुरामांची बलदंड, आक्रमक मुर्ति आहे. ७ फूट ४ इंच उंचीच्या या मूर्तीचा उजवा पाय समोर आहे. परशुराम त्वेषाने अंगावर येत आहेत असेच ही मूर्ती पाहून वाटते. या धर्मशाळेच्या पूर्वेला सन्निहत नावाचे सरोवर असून तेथेही परशुरामांचे एक भव्य मंदिर अलीकडेच उभे राहिले आहे.
५. जम्मु येथील परशुराम मंदिर – हिमालयात परशुरामांचा वावर काराकोरम खिंडीपासून अरुणाचलपर्यंत होता. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशात जागोजाग परशुरामांची लहानमोठी स्थाने आहेत. जम्मू प्रांतात शिरतानाच परशुरामांचे एक मंदिर उंच पर्वतावर उभे आहे. लांबूनहि दिसणारे उंच शिखर, प्रशस्त पटांगण आणि देखणे गर्भगृह या मंदिरात आहे.
६. जन्मस्थळ जानापावा – परशुरामांचा जन्म चंबळ नदीच्या खो-यात असलेल्या जमदग्नी आश्रमात झाला. एका उंच पर्वतावरील या आश्रमाच्या परिसराला जानापाव असे म्हटले जाते. मध्यप्रदेशातील इंदूरजवळ ३० कि.मी. वर महू हे महत्त्वाचे गाव आहे. हे रेल्वे स्थानकहि आहे. महूपासून जानापाव १० कि. मी. अंतरावर आहे. प्राचीन काळापासून जमदग्नी आश्रम अशीच या परिसराची ओळख आहे. येथे जमदग्नी ऋषींची मूर्ति असणारे एक प्राचीन मंदिर आहे आणि जवळ परशुरामांची काळ्या दगडाची सुबक मूर्ति असणारे दुसरे मंदिर आहे. जानापावला दरवर्षी लाखोंच्या पाच यात्रा भरत असल्या तरी पर्यटन दृष्ट्या हे स्थळ दुर्लक्षितच होते. मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच जानापावला तीर्थक्षेत्राचा आणि पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. महामार्गापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी ४ कि.मी.चा मोठा रस्ता आता तयार झाला आहे. तेथे दोन मजली भव्य पर्यटन निवास आणि मोठे सभागृह सरकारने बांधले आहे. डोंगरावरच वाहनतळासाठी मोठी जागा दिली आहे. या जन्मस्थानी परशुरामांचे भव्य मंदिर उभारण्यात आले असून त्यात जमदग्नी आणि रेणुका यांच्याही संगमरवरी मूर्ती आहेत. जमदग्नींनी स्थापन केलेल्या जनकेश्वर मंदिर, पंचमुखी मारूती मंदिर आणि भैरवनाथ मंदिर यांचाही जीर्णोध्दार झाला आहे. चंबळ नदीजवळ असणा-या प्राचीन ब्रम्हतीर्थातच भव्य ब्रम्हकुंडही तयार करण्यात आले आहे. या जन्मस्थानी महाशिवरात्र, परशुराम जयंती, सर्व श्रावणी सोमवार, सर्वपित्री अमावास्या आणि कार्तिकी पौर्णिमेला यात्रा भरतात. देशभरातून लाखो भाविक या यात्रांसाठी येतात. विशेषतः आदिवासींची गर्दी या यात्रांसाठी मोठ्या प्रमाणात असते.
७. उदावड गुंफा मंदिर – राजस्थानीतील सादडी खेड्याजवळ हे उदावड मंदिर उंच टेकडीवरील गुंफेमधे आहे. गुंफेपर्यंत जाण्यासाठी पाय-या आहेत. गुंफेचा आकार २० फूट x २० फूट असल्यामुळे एका वेळी १५-२० भाविकांनाच दर्शन घेता येते. आपल्याकडे प्रचलित असणा-या देवपंचायतनात परशुरामाचा समावेश नसतो. पण या गुंफेमधे पंचायतन असून त्यातील मुख्य देवता परशुराम आहे. त्यांच्या शेजारी गणेश, कार्तिकेय, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती आहेत. परशुरामांची मूर्ती तपश्चर्या मुद्रेत आहे. जवळच एका राक्षसाचा वध झालेला दाखविण्यात आलेला आहे. समुद्रसपाटीपासून २ हजार फूट उंच असणा-या या गुंफा मंदिरात निवास, भोजन, स्नानघर अशा सर्व व्यवस्था आहेत. जवळच असणा-या परशुराम कुंडात स्नान केल्यास चर्मरोग नाहीसे होतात, असे सांगितले जाते. अहमदाबाद-दिल्ली रेल्वेमार्गावर फालना नावाचे रेल्वेस्थानक आहे. तिथून १५ कि.मी.अंतरावर सादडी हे खेडेगाव असून तिथून उदावड मंदिरापर्यंत पोचता येते. राजस्थानातील उदयपूर या शहरापासूनही उदावडला बसव्यवस्था आहे.
८. त्र्यंबकेश्वर – नाशिकजवळचे त्र्यंबकेश्वर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिध्द आहे. त्र्यंबकेश्वराचा हा परिसर परशुरामांनी येथे केलेल्या घनघोर तपश्चर्येसाठीही ओळखला जातो. येथे पूर्वी परशुरामांचे प्राचीन मंदिर होते. आता तेथे उभे असलेले मंदिर १२५ वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरातील परशुराम मूर्ति वैष्णव पध्दतीची म्हणजे चतुर्भुज आहे. परशुराम व्दिमयूर मंदिरात एक स्वतंत्र नारायण मूर्तीहि असून ती काळ्या चमकदार गंडकी पाषाणाची आहे. दोन हजार वर्षांपूर्वी सम्राट सातवाहनांनी नाशिक क्षेत्री अश्वमेधासह मोठे यज्ञ केले. त्यांचे शिलालेख नाशिकजवळ मिळाले आहेत. परशुरामांची प्राचीन मूर्ती या यज्ञांच्या निमित्ताने स्थापन करण्यात आली असावी, असे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. त्र्यंबक-परशुराम क्षेत्र या नावाने हा परिसर ओळखला जातो.
९. शूर्पारक क्षेत्र – गेली अडीच हजार वर्षे शूर्पारक या नावाने ओळखले जाणारे बंदर म्हणजे आजचा वसईजवळचा नालासोपारा हा भाग. येथे विमलासुराने यज्ञयागात व्यत्यय आणल्यामुळे परशुरामांनी शस्त्र हाती घेतले आणि त्याचा वध केला अशी आख्यायिका आहे. विमलासुराच्या अत्याचाराने उध्वस्त झालेला हा संपूर्ण परिसर परशुरामांनी स्वतः पुन्हा वसविला, म्हणून तो परशुराम क्षेत्र या नावाने ओळखला जात असे. शूर्पारक हे त्याचे अपभ्रष्ट रूप आहे. परशुरामांची येथे असलेली मूर्ती काळ व काम सोबत असलेली आहे. रेणुका व जमदग्नी यांचीही स्वतंत्र मंदिरे येथे आहेत. मुंबई-सूरत रेल्वेमार्गावर वसईजवळ नालासोपारा स्थानक आहे. येथून या मंदिर परिसराकडे जाता येते.
१०. तिरूअनंतपूरम – केरळची राजधानी तिरूअनंतपुरमच्याजवळ कलियार आणि कालामानायर आणि पार्वतीपू या दोन नद्यांचा संगम आहे. या संगमाला तिरूवल्लभवृंदा असे म्हटले जाते. या संगमाजवळच नदीकिना-यावर एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असणा-या या मंदिरात पोचण्यापूर्वीच प्रवेशद्वारावर आपले परशुरामांच्या एका भव्य मूर्तीने स्वागत होते. व्याघ्रांबरावर बसलेली ६ फूट उंचीची ही आसनस्थ मूर्ति आक्रमक असली तरी अभय देणारी आहे. या मूर्तीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर उजवीकडे घनदाट झाडीत परशुरामांचे प्राचीन मंदिर आहे. केरलपूत राजवंशाच्या काष्ठशैलीमधे या मंदिराची बांधणी झाली आहे. त्यामुळे मंदिराचा जीर्णोध्दार ३०० वर्षापूर्वी झाला असावा, असे दिसते. खास दाक्षिणात्य पध्दतीच्या गोपुरसदृश मंदिरात मध्यभागी परशुरामांची चतुर्भुज मूर्ति आहे. मंदिराचा आकार षट्कोनी असून गर्भगृह उंच आहे. मूर्तीच्या हातात परशु, शंख, चक्र आणि कमंडलू आहेत. त्यावरून ती वैष्णव पध्दतीची मानली जाते. या मूर्तीजवळच ब्रम्हदेव आणि शिव यांच्या सोपानयुक्त घुमट्या आहेत. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा संगम येथे साधला गेला आहे. परशुराम जयंती, वैकुंठ चतुर्दशी, सर्व एकादशा आणि कार्तिक कृष्ण नवमी या दिवशी येथे मोठ्या यात्रा भरतात.