भगवान परशुरामांचे आजोबा, ऋषि ऋचिक यांचा विवाह इश्वाकू वंशातील गाधी राजाची कन्या सत्यवती हिच्याशी झाला होता. गाधी राजाच्या पन्तीला पुत्र नव्हता. सत्यवतीलाही पुत्रप्राप्तीची आस होती. म्हणून तिने ऋचिक ऋषींशी दोघांनाही पुत्र व्हावा यासाठी चर्चा केली.ऋचिक ऋषींनी दोघींसाठी दोन चरु तयार केले. एका चरूमुळे सत्यवतीला ब्राह्मण गुणसुत्र पुत्र तर तिच्या मातेला क्षत्रिय गुणयुक्त पुत्र व्हावा, अशा पद्धतीने हे चरू अभिमंत्रीत केले होते. प्रत्यक्षात सत्यवतीच्या मातेने या चरुंची अदलाबदल केली. हे गुपित ऋचिक ऋषींना कळले, तेव्हा ओशाळलेल्या सत्यवतीने ‘मला ब्राह्मण गुणयुक्त पुत्र हवा’ असा हट्ट धरला. ऋचिक ऋषींनी मात्र आता ‘जे घडले आहे, त्यात बदल होणार नाही’ असे सांगितले. त्यावर सत्यवतीने प्रार्थना केली की निदान माझा नातू तरी ब्राह्मण गुणयुक्त असावा. या चरुंमुळे गाधीराजाला पत्नीच्या पोटी विश्वामित्र जन्माला आले. तर सत्यवतीला जमदग्नी यांच्यासारखा योद्धा पुत्र प्राप्त झाला. भृगु कुलाचा मूळ स्वभाव क्षत्रिय वृत्तीचा नसल्यामुळे जमदग्नींनी आयुष्यभर तपाचरण केले. पण क्षत्रिय अंश असलेल्या चरूमुळे ते शांत स्वभावाचे न राहता कोपिष्ट झाले. जमदग्नी पुत्र असलेल्या परशुरामांमध्ये मात्र ब्राह्म आणि क्षात्र तेज दोन्ही निर्माण झाले.
महर्षी ऋचिकांचा आश्रम आजच्या आंध्र प्रदेशात गोदावरीकाठी कोटितीर्थ येथे होता. अनेक वर्षे तेथे तपश्चर्या केल्या नंतर ऋचिक ऋषी पुढील साधनेसाठी गंगाकाठी गेले. तेथे रेणू नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची कन्या रेणुका हिचा तु स्वयंवर मांड असा सल्ला ऋचिक ऋषींनी राजाला दिला. या स्वयंवराच्या वेळी त्यावेळचे सर्व राजे आणि इंद्रादि देवही उपस्थित होते. पण रेणुकेने जमदग्नी ऋषींची निवड करून त्यांनाच माळ घातली. त्यावेळी देवराज इंद्राकडून रेणुकेला कल्पवृक्ष, चिंतामणी, कामधेनू आणि अनेक दिव्य रत्ने, तसेच वस्त्रालंकार भेट म्हणून मिळाले. यातील कामधेनू या स्वर्गस्थ गायीमुळे पुढील कथानक घडले.भृगुऋषींचे देशभर विविध भागांत आश्रम होते. ते चालविण्याची जबाबदारी जमदग्नी ऋषींवर आली होती. आजच्या कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या काठी बेळगाव-सौंदत्तीजवळ असलेल्या भृगु आश्रमात जमदग्नी आणि रेणुका येऊन राहिले. सौंदत्तीच्या आश्रमाची जबाबदारी माता रेणुका सांभाळीत असत. जमदग्नी ऋषी देशभर संचार करीत असत. जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांना पाच पुत्र होते. वसु, विश्वावसु, बृहद्भानू, बृहत्कण्व आणि भार्गवराम अशी त्यांची नावे होती. परशुरामांचे मूळ नाव फक्त राम असेच असले, तरी जामदग्न्य राम, भार्गवराम आणि रेणुकानंदन या नावांनीहि ते ओळखले जातात. सौंदत्ती जवळच्या आश्रमात पहिली १२ वर्षे मात्या –पित्यांकडून शिक्षण घेतल्यानंतर भार्गवराम पुढील तपश्चर्येसाठी कैलास मानससरोवराकडे गेले.
शिवभक्त असलेल्या भार्गवरामांनी प्रत्यक्ष शिवाकडून सर्व प्रकारच्या शांकरविद्या संपादन केल्या. शिवाने त्यांना धनुर्विद्येसह संमोहनशास्त्र, वायव्यास्त्र, पाशुपतास्त्र आणि ब्रह्मास्त्र यांचे शिक्षण दिले शिवाबरोबरच भार्गवरामांनी गणेशाचीही उपासना केली आणि त्यांच्याकडून परशुविद्या शिकून घेतली. गणेशाने दिलेल्या दिव्य परशुमुळेच भार्गवरामांचे नामकरण परशुराम असे झाले. याच काळात परशुरामांनी अतिशय कठोर अशी पंचाग्नीसाधना केली. या साधनेत डोक्यावर तळपता सूर्य आणि चारही बाजूंनी तप्त अग्नीची धग, अशा स्थितीत तपश्चर्या करावी लागते. याच काळात परशुरामांनी यतिविद्या संपादन केली. तिला स्मर्तृगामी विद्या असे म्हटले जाते. ही विद्या येत असलेल्या व्यक्तीची आठवण कोणीही, कुठेही केली तरी या विद्येच्या जोरावर त्या व्यक्तीसमोर साक्षात प्रकट होता येते.हिमालयातील निरमुंड म्हणून आज प्रसिद्ध असलेल्या स्थानी जमदग्नींचा आश्रम होता. पत्नी रेणुकेसह ते या आश्रमात राहत होते. माता रेणुका नदीवर स्नानासाठी गेली असताना तिथे तिने गंधर्वांची जलक्रीडा पाहिली. त्या नादात तिला आश्रमात परतायला उशीर झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमदग्नी ऋषींनी त्यांचा वध केला आणि रेणुकामातेच्या वधासाठी परशुरामांना पाचारण केले. तेव्हा मानसरोवराजवळ असलेले परशुराम यति विद्येने पित्यासमोर प्रकट झाले. पित्याची आज्ञा ऐकताच क्षणाचाही विचार न करता त्यांनी आपल्या परशुने मातेचा शिरच्छेद केला. प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी परशुरामांना दोन वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे पहिल्या वराने त्यांनी माता व बंधूंना जिवंत करा अशी प्रार्थना केली. या घटनेची स्मृती रेणुकामातेला राहू नये असा दुसरा वर मागितला. तरीही मातृ हत्येचे पातक आणि डाग परशुरामांना लागलाच.
आजच्या मध्यप्रदेशातील नर्मदाकाठी महिष्मती नावाची नगरी होती. तिचे आजचे नाव महेश्वर आहे, दैह्य वंशाचा महापराक्रमी राजा कार्तवीर्य सहस्त्रार्जुन महिष्मतीत राज्य करीत होता. त्याच्या भेटीला आलेल्या देवर्षी नारदांनी जमदग्नी ऋषींच्या आश्रमातील वैभवाचे वर्णन केले आणि या वैभवाने तुझेहि डोळे दिपतील असे सांगितले. तेव्हा असूया निर्माण झालेला राजा कार्तवीर्य सौंदत्तीजवळच्या जमदग्नी आश्रमात पोचला. जमदग्नी ऋषी आणि रेणुकामातेने त्याचे व संपूर्ण सैन्याचे उत्तम आदरातिथ्य केले. इंद्राने दिलेल्या कामधेनू गायीमुळे हे शक्य झाले, हे समजल्यावर राजाने जमदग्नींकडे कामधेनूची मागणी केली. ऋषींनी कामधेनू दान करण्याची तयारी दाखवली, पण राजाला कामधेनू मोबदला देऊन हवी होती. या मागणीला नकार मिळताच राजाने कामधेनू बळजबरीने नेली. या घटनेमुळे आश्रमाचे वैभवच नाहीसे झाले.ही घटना समजताच परशुरामांनी थेट महिष्मती नगरीत जाऊन कार्तवीर्यास युद्धाचे आव्हान दिले आणि राजाचा पूर्ण पराभव करून वधहि केला. प्रायश्चित्त म्हणून परशुराम पुन्हा तपश्चर्येला निघून गेले. कार्तविर्याच्या वधाचा सूड उगविण्यासाठी त्याच्या पुत्रांनी जमदग्नी आश्रमावर हल्ला केला. सर्व प्रकारची अस्त्रे आणि विद्या येत असूनहि शस्त्र हाती न धरण्याच्या नियमामुळे या युद्धात जमदग्नी ऋषींचा आश्रम तर उद्ध्वस्त झालाच, पण कार्तवीर्याच्या पुत्रांनी जमदग्नींचाच वध केला. हे वृत्त कळल्यावर भेटायला आलेल्या परशुरामांना पुर्वाश्रमींची राजकन्या व क्षत्रियकन्या असलेल्या माता रेणुकेने पृथ्वी निःक्षत्रिय कर अशी आज्ञा केली. ती शिरसावंद्य मानून परशुरामांनी उन्मत्त झालेल्या २१ क्षत्रिय राजांचा संपूर्ण पराभव केला.
पृथ्वीवर संपूर्ण विजय मिळविल्यानंतर परशुरामांनी कच्छ जवळ एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञात महर्षी कश्यपांना जिंकलेली सर्व भूमी दान केली. या पृथ्वीचे स्वामित्व मी सोडले असल्यामुळे मला आणि माझ्या शिष्यांना येथे राहता येणार नाही असे सांगून भगवान परशुराम दक्षिणेकडे कोकण क्षेत्रात उतरले.वरील दोन्ही कथांमध्ये पृथ्वी असा शब्द आहे. आज आपण संपूर्ण जगालाच पृथ्वी असे म्हणतो. पण पूर्वी पृथ्वी ही संकल्पना लागवडीखाली असलेल्या प्रदेशासाठीच वापरली जात असे. इश्वाकू वंशातील राजा पृथु संन्यस्त झाला आणि त्याने जंगलात राहून वृक्ष, वनस्पतींच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यामधून खाण्या योग्य अन्न, कृतिमरीत्या लागवड करून तयार करता येते, हे त्याने सिद्ध केले आणि प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून असलेला समाज शेतीकडे वळला. परशुरामांच्या काळात फक्त उत्तर भारतात लागवड सुरू झाली होती. त्यामुळे तेवढ्याच भागाला पृथ्वी असे म्हणत असत.
अपरान्ताची वसाहत
गुजरातमधील भरूचपासून दक्षिणेकडे थेट कन्याकुमारीपर्यंतची चिंचोळी भूपट्टी भगवान परशुरामांनी वसविली. तोपर्यंत पृथ्वी या संकल्पनेत समाविष्ट नसलेला हा अपरान्ताचा भाग शिष्यांची ६४ कुळे या भागात आणून त्यांनी लागवडीखाली आणला. या घनदाट अरण्यात नागरी वस्ती आणि आर्य संस्कृतीप्रणीत यज्ञव्यवस्था परशुरामांमुळे सुरू झाली. साहजिकच या संपूर्ण पट्ट्यात परशुरामांची अनेक लहानमोठी मंदिरे आणि ठाणी पाहायला मिळतात. मुंबईतील वाळकेश्वराचा बाणगंगा तलाव परशुरामांनीच बांधला, असे मानले जाते. कन्याकुमारीचे कन्याकुमारी मंदिरही परशुरामांनीच बांधले असून त्या मंदिराजवळचा पापनाशन तीर्थ म्हणून ओळखला जाणारा तलावहि त्यांनीच बांधला. माता अहल्येला भ्रष्ट केल्यामुळे गौतम ऋषींकडून शापित झालेल्या इंद्राला पापक्षालनासाठी या स्थानीच यावे लागले हे संपूर्ण अपरान्त क्षेत्र परशुराम भूमी म्हणूनच ओळखले जाते.