मंदिरामध्ये साजरे होणारे महिन्यानुसार धार्मिक सण 

चैत्र :

गुढीपाडवा–– चैत्र शु.प्रतिपदा या दिवशी मंदिरामध्ये गुढी उभारली जाते व हिंदू नवनर्षाची सुरूवात केली जाते. भगवान परशुरामांची महापूजा केली जाते. तसेच भगवान श्रीराम यांची मुर्ती श्री विठ्ठल मंदिरातून वाजत गाजत परशुराम मंदिरात आणली जाते. ग्रामस्थ व भाविकांच्यावतीने अत्यंत श्रध्देने आरत्या केल्या जातात. संस्थानच्या वतीने सर्व भाविकांना प्रसाद दिला जातो.
अखंड हरीनाम सप्ताह – श्री सत् नाम वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने चैत्र शु. व्दितीया ते चैत्र शु. अष्टमी असा सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होतो. वै.ह.ब.प कोलगे महाराज प्रणीत या सप्ताहाला असंख्य वारकरी व भाविक उपस्थीत असतात.
रामनवमी – रामनवमी हा उत्सव पारंपारीक रित्या साजरा केला जातो. विष्णुंनी वेळोवेळी घेतलेल्या मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौध्द व कलंकी या दहा अवतारापैकी चार अवतारांचे नाट्यरूपांत सादरीकरण केले जाते. या अवतारांचे नाट्य पुरातन कलाकारांनी लिहीले आहे. यात संवादाच्या बरोबरीने आरत्या, ऋचा,साक्या, दिंडी आदि काव्याचे प्रकारहि वापरण्यात आले आहेत.ग्रामस्थांनी दशावतार नाट्य समाज या संस्थेच्या माध्यमातून दशावतार ही नाट्य चळवळ 100 वर्षे जपली आहे. तबला, पेटी, झांज आदि वाद्यांच्या आधारे सादर केल्या जाणाऱ्या नाट्याला सेगितबध्द केले जाते. आकर्षक रंगभुषा, ऎतिहासीक वेशभुषेचा वापर करून नाट्य आस्वाद्य केले जाते. दशावताराची 100 वर्षांची परंपरा आहे. परशुराम मधील ग्रामस्थ अत्यंत श्रध्देने ही पारंपारीक कला जोपासत आहेत.
हनुमान जयंती – भगवान श्री हनुमान यांचा जन्मोत्सव चैत्र शु. पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. ग्रामस्थ व भाविकांच्यावतीने अत्यंत श्रध्देने आरत्या केल्या जातात. 

वैशाख :

अक्षय तृतिया –वैशाख शु. तृतीया या दिवशी राजराजेश्वर भगवान परशुरामांचा जन्मदिवस दरवर्षी अक्षय तृतिया म्हणजेच परशुराम जयंती उत्सव साजरा केला जातो. राजराजेश्वर भगवान परशुरामांचा जन्म वैशाख शु. तृतीयेला झाला. या तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. हिंदू धर्मात 3।। मुहुर्ताला महत्व आहे त्या मुहुर्तापैकी हा एक मुहुर्त आहे. हा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो. परशुराम जन्मदिनी सायंकाळी जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला जातो. नामवंत किर्तनकार जन्मोत्सवाचे किर्तन करतात व परशुराम कथा सांगतात. संपुर्ण प्रांगणात वीज पुरवठा बंद करून केवळ तेलाच्या दिव्यांच्या (पणत्या, मशाल, हंड्या)च्या प्रकाशात जन्म साजरा केला जातो. यावेळी भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावेळी भाविकांना संस्थानच्या वतीने व श्रृंगेरी मठ, पुणे यांच्या वतीने प्रसाद वाटपही केले जाते. उत्सव काळात रोज संगीताचा कार्यक्रम, किर्तन, भजन केले जाते. ग्रामस्थ आरत्या म्हणत पालखी घेऊन पाच प्रदक्षीणा घालतात, परशुराम नाट्य समाजाच्या वतीने 3 अंकी नाटक सादर करून मनोरंजन केले जाते.

जेष्ठ :

– जेष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी महिला वटवृक्षाची मनोभावे पुजा करतात व पतिव्रता देवी रेणुकामाता यांचे दर्शन घेतात. संस्थानच्या वतीने देवी रेणुकामाता मंदिरामध्ये हळदीकुंकू समारंभ साजरा केला जातो. 

आषाढ :

आषाढ शु. एकादशी म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त परशुराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. असे मानले जाते की भगवान पांडुरंग या दिवशी भगवान परशुराम यांच्या भेटीसाठी श्री क्षेत्र परशुराम येथे येतात म्हणुन या स्थानाला विशेष महत्व आहे. संस्थानच्या वतीने येणा-या भाविकांना उपवासाच्या प्रसादाचा वाटप केले जाते. असंख्य भक्तगण या दिवशी दर्शन घेतात.

श्रावण :

परमपुज्य श्री ब्रम्हेंद्रस्वामी पुण्यतिथी – या महिन्यात भगवान परशुरामांचे परम भक्त आणि परशुराम मंदिराचे निर्माते परमपुज्य श्री ब्रम्हेंद्र स्वामी यांची पुण्यतिथी असते. या दिवशी मंदिरामध्ये स्वामींच्या पुण्यतिथी निमीत्त भगवान परशुराम यांची महापुजा व स्वामींची यथासांग पुजा केली जाते.
पवित्ररोपण–- देवाची श्रावणी (पवित्ररोपण) म्हणजे देवाची यथासांग महापुजा करून देवाची जानवी बदलली जातात व देवाला दागदागीन्यांनी सजवले जाते. हा एकच दिवस मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे ठेवले जाते. ग्रामस्थ व भाविक अहोरात्र जागर करतात.
श्रीकृष्ण जयंती – श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी या दिवशी मंदिरामध्ये परशुराम ग्रामस्थांच्या वतीने पारंपारीक पध्दतीने संगीतबध्द टिपऱ्या खेळल्या जातात. रात्रौ 12.00 वाजता भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मकाळ साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला (दहीहंडी) निमीत्त बालगोपाल वर्ग मंदिरात पहिली हंडी फोडुन गोपाळकाल्याला सुरुवात करतात. असेच अनेक सण धार्मिक प्रथेप्रमाणे साजरे केले जातात. 

भाद्रपद :

भाद्रपद शु. चतुर्थी या दिवशी श्री गणेशाचे घरोघरी आगमन होते. श्री परशुराम मंदिरात देखील श्री गणेशोत्सव साजरा केला जातो. श्री सिध्दीविनायकाची महापूजा केली जाते. या गणेशाची मूर्ति ही 300 वर्षांपूर्वीची आहे व हा सिध्दीविनायक नवसाला पावतो अशी ख्याती आहे. संस्थानमध्ये सुध्दा श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते व 6 दिवस यथासांग पुजन केले जाते.

अश्विन :

नवरात्रोत्सव– अश्विन शु.प्रतिपदा या दिवशी श्री रेणुकामाता मंदिरामध्ये देवीची घटस्थापना केली जाते. मंदिर सजविले जाते व देवी रेणुकामातेला दागदागिन्यांनी सजविले जाते. ग्रामस्थ महिला वर्ग नऊ दिवस आरत्या व भजन करतात. अश्विन शु.अष्टमी या दिवशी श्री विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने श्री महालक्ष्मीची प्रतीष्ठापना करून पुजन केले जाते. अष्टमीला नवचंडी हवन केले जाते व भाविकांना प्रसाद दिला जातो.देवी श्री रेणुकामातेला नवरात्रात नऊ दिवस दररोज वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवून तिला सजविली जाते.
दसरा – या दिवशी भगवान परशुराम यांची पालखी घेऊन ग्रामस्थ शेजारील गावात सोने लुटायला जातात वो पारंपारिक पध्दतीने कार्यक्रम उरकून वाजत गाजत पालखीचे मंदिरामध्ये आगमन होते. या दिवशी ग्रामस्थ व भाविक एकमेकाला सोने (आपट्याची पाने) वाटतात व आनंद साजरा करतात.
कोजागिरी पौर्णिमा – या दिवशी रात्रौ मंदिरामध्ये ब्राह्मणांद्वारे दैवे व मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. सर्व भाविकांना व गुरूजींना खास दुधाचा प्रसाद दिला जातो.
दिपावली – दिपावली हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिरात दिव्यांची आरास केली जाते. दावी श्री लक्ष्मीचे यथासांग पूजन केले जाते. सर्व कर्मचारी वर्ग तसेच येणाऱ्या भाविकांना दिपावलीच्या खास फराळाचा प्रसाद दिला जातो.  

कार्तिक :

कार्तिकी एकादशी – उत्सवाच्या दिवशी भाविकांची खूप गर्दी असते. दर्शनासाठी येणा-या सर्व भाविकांना उपवासाच्या पदार्थांचा प्रसाद दिला जातो. याच दिवशी गावातील श्री विठ्ठल मंदिरात मोठा उत्सव असतो. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज रात्री किर्तन, भजन व पारंपारिक आरत्या केल्या जातात. तिसऱ्या दिवशी येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

मार्गशीर्ष :

दिडशे वर्षांपासूनची परंपरा असलेली संतांची एकादशी हा उत्सव याच महिन्यात साजरा केला जातो. कोकण दिंडी समाजाच्या वतीने सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह केला जातो या सप्ताहाला भाविकांची खूप गर्दी असते. मार्गशीर्ष कृ. एकादशी म्हणजेच संतांची एकादशी या दिवशी मंदिरात दर्शनासाठी खुप गर्दी असते. दर्शनासाठी येणा-या सर्व भाविकांना उपवासाचा प्रसाद वाटप केला जातो. 

पौष :

मकरसंक्रांत – या दिवशी महिला वर्ग हळदीकुंकू समारंभ करतात व सर्वांना तीळगुळाचा प्रसाद दिला जातो. हा खास स्त्रियांचा सण. आनंदाचा व उत्साहाचा. या दिवशी महिला घरोघरी सुगड पुजन करतात. सुगडात बोरे, ऊस, हरभरे, तिळगूळ घालतात. हा सण थंडीच्या दिवसात येतो म्हणुनच उष्णता मिळणारे पदार्थ म्हणजेच तीळ (स्निग्धता) व गूळ मिश्रित तीळगूळ एकमेकाना वाटतात व देताना म्हणतात तीळगूळ घ्या व गोडगोड बोला. याच दिवशी नरकासुराचा वध देवीने केला, म्हणुनच हा आनंदाचा सण भारतातील सर्व राज्यातून साजरा केले जातो.

माघ :

पायीवारी – माघ शु. एकादशीया दिवशी भगवान श्री परशुराम मंदिरातून कोकण दिंडी समाज यांच्या वताने श्री क्षेत्र परशुराम ते पंढरपुर अशी ही पायीवारी असते. भगवान श्री परशुराम यांच्या पादूका पालखीमध्ये घेऊन वारकरी पायीवारीला सुरूवात करतात व माघी एकादशीला पंढरपूर येथे पोहेचतात. असंख्य भाविक या वारीमध्ये भाग घेतात. याच दिवशी भगवान श्री परशुराम मंदिरातून देवी रेणुकामाता यांच्या पादूका घेऊन श्री. पवार व भाविक भक्तगण श्रध्देने व भक्तीभावाने सौंदत्ती, कर्नाटक येथे या पादूका घेऊन जातात. या वारीला देखील असंख्य भक्तगण उपस्थीत असतात.
गणेश जयंती – या दिवशी श्री सिध्दीविनायकाची महापूजा केली जाते व उत्सव साजरा केला जातो. 300 वर्षांपुर्वी याच दिवशी परमपुज्य श्री ब्रह्मेंद्रस्वामींनी भगवान श्री परशुराम मंदिराचे बांधकाम करून भगवान श्री परशुरामांच्या मूर्तिंची प्रतिष्ठापना काली होती. म्हणुन हा दिवस त्या मूर्तिंचा वाढदिवस म्हणुन साजरा केला जातो.
महाशिवरात्र – माघ कृ. त्रयोदशी या दिवशी साधारण तीस ते चाळीस हजार भाविकांची गर्दी असते. या दिवशी देवाला अभ्यंग स्नान घातले जाते व दागदागिन्यांनी तसेच फुलांनी सजवले जाते. दर्शनासाठी येणा-या सर्व भाविकांना उपवासाच्या पदार्थांचा प्रसादाचा दुपारी 11 ते 3 पर्यंत दिला जातो. रात्री पाच प्रदक्षिणा आरत्या, भजन व गजर म्हणत घातल्या जातात. 

फाल्गुन :

होळी पौर्णिमा-– या उत्सवानिमीत्त देवाची होळी पारंपारीक पध्दतीने साजरी केती जाते. पंचक्रोशीत या होळीला मान आहे. ही होळी लागल्याशिवाय इतरत्र होळी लावत नाही. याच उत्सवात ग्रामदेवता पालखी घरोघरी नेली जाते व देवाचे यथासांग पुजन केले जाते. पातखीसोबत ढोल, ताशे, निशाण, अब्दागीर घेऊन ग्रामस्थ वाजत गाजत पालखी फिरवितात. प्रत्याक घरासमोर सारवण, सडा संमार्जन व रांगोळ्या काढलेल्या असतात. पालखीसोबत सर्व ग्रामस्थ व महिला सुध्दा असतात. परगावी राहणारे ग्रामस्थ पालखीपूजनासाठी आपआपल्या घरी येतात. कोकणात या सणाला विशेष महत्व आहे.