परशुराम मंदिर इतिहास 

परशुराम येथील भगवान परशुरामांचे मंदिर इ. स. ५७० मध्ये बांधण्यात आले, चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इ. स. ५७० मध्ये चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसविले गेले. दक्षिण गुजरातमधून समुद्रमार्गे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यज्ञऋषींना आणले गेले. तेच पुढे चित्त्पावन म्हणून प्रसिद्ध झाले, असे डॉ. जोग यांचे प्रतिपादन आहे.

अश्वमेध, राजसूय यांसारखे सर्वांत मोठे यज्ञ केले जात. तेव्हा यज्ञपती म्हणून भगवान परशुरामांच्या मंदिराची प्रतिष्ठापना यज्ञभूमीजवळ केली जात असे त्याबरोबर चारहि वेद जिच्यात सामवले आहेत, अशा वेदवासिनी किंवा विंध्यावासिनी देवीचे मंदिरहि जवळच बांधले जात असे. यज्ञभूमीचा रक्षणकर्ता म्हणून कार्तिकेय ओळखला जातो. स्वाभाविकच यज्ञस्थळाजवळ भगवान परशुराम आणि विंध्यवासिनीबरोबर कार्तिकेयाचे मंदिरही बांधले जात असे. चिपळूणमधील वर उल्लेख केलेल्या अश्वमेध यज्ञासाठीच या तिन्ही देवतांची मंदिरे चिपळूणच्या उत्तरेला बांधण्यात आली, असे संशोधक डॉ. जोग यांचे म्हणणे आहे.

कोकणात नंतरच्या काळात वेगवेगळ्या मुस्लिम सत्तांची आक्रमणे झाली, तेव्हा इतर मंदिरांप्रमाणे ही तिन्ही मंदिरे वारंवार पाडली गेली आणि पुन्हा बांधली गेली. तरी मूर्तींचे प्राचिनत्व लक्षात येणार आहे.