परशुरामक्षेत्र

श्रीक्षेत्र परशुराम ही भगवान परशुरामांची त्यांनी निवडलेली तपोभूमी मानण्यात येते.
भगवान परशुरामांनी आपले वडील महर्षी जमदग्नी यांची हत्या करणाऱ्या उन्मत्त सहस्त्रार्जुनाला व त्याचे पाठिराखे असलेल्या छोट्या- मोठ्या सत्तांध राजांना युध्दभूमीत पराभूत केले व शस्त्र खाली ठेवले. जिंकलेली त्या काळातील पृथ्वी त्यांनी सुजाण व सुसंस्कृत राज्यकर्त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी कश्यप मुनींना अर्पण केली. दान केलेल्या भूमीत स्वतः रहाणे योग्य नाही म्हणून परशुरामांनी कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या अथांग सागराला आपल्या निवासासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याकरिता थोडे मागे हटण्याची विनंती केली.

सागराने ती विनंती मान्य केली नाही म्हणून परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटविला. गुजराथपासून केरळपर्यंत नवा भूप्रदेश निर्माण झाला व परशुरामांनी तपश्चर्येसाठी स्वतःकरिता महेंद्र पर्वताची निवड केली व तो पर्वत म्हणजेच चिपळूण जवळ असलेले श्री क्षेत्र परशुराम.या विश्वव्यापी श्री विष्णूच्या चिरंजीव अवताराने महेंद्र पर्वत म्हणजे कोकणातील आजचे परशुरामक्षेत्र तपश्चर्येसाठी निवड़ले. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला प्रसन्न वातावरण लाभलेले आहे. म्हणूनच हे एक श्रध्दाकेंद्र लोकप्रिय झाले आहे. 

शिवछत्रपतींच्या काळात स्वयंभू स्थान व छोटेसे मंदीर होते त्याच्यासमोर समर्थ रामदासांनी स्थापन केलेले दक्षिणाभिमुख मारुती मंदीर आहे. ब्राह्म व क्षात्र तेजाचे मूर्तिमंत रुप असलेले छत्रपति त्या काळात अनेकदा परशुरामला दर्शनासाठी येत. षोडशोपचारे पूजा करीत. देवाला उत्पन्नासाठी देणग्या देत, संभाजी राजेहि वारंवार दर्शनाला येत. राजाराम महाराज तर परशुरामांच्या व ब्रह्मेंद्रस्वामींच्या दर्शनासाठी परशुरामला मुक्काम करीत. शिवछत्रपती चिपळूणच्या रामतीर्थात स्नान करून परशुरामांची यथासांग पूजा करुन, प्रतापगडला भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन राज्याभिषेकासाठी रायगडाला गेले असे इतिहासात उल्लेख आहेत.आजहि सातारचे भोसले घराणे परशुरामांना आपले दैवत मानते.
        शंभर वर्षांपूर्वी वेहेळ्यातील राजेशिर्केंना आजारपणामुळे पंढरीच्या वारीला जाता आले नाही म्हणून पांडुरंगाने स्वप्नात येऊन मी पुढील एकादशीला परशुराम दर्शनासाठी क्षेत्र परशुराम येथे येईन असे सांगितले, तेव्हापासून राजेशिर्के घराण्याची मोठी दिंडी सप्ताहासाठी परशुरामला येते.जंजि-याच्या सिद्दीने परशुराम मंदिराला काही गावे इनाम दिली. अग्निहोत्री असलेले शेकडो विदेशी नागरिक परशुराम दर्शनाला येतात.
नवनिर्मितीचे जनक परशुराम
पुराण काळातील त्यांचे चरित्र पाहिले तर ते ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचा संगम झालेले. श्री विष्णूंचे सहावे अवतार होते हे स्पष्ट होते.
परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटविला. गुजराथपासून केरळपर्यंत नवा भूप्रदेश निर्माण केला. भू निर्मितीचे तंत्र अवगत असलेले ते पहिले रेक्लमेशन इंजिनिअर होते.
यज्ञ संस्कृतीचे ते प्रवर्तक होते त्यामुळे सर्वांना जीवनावश्यक असलेला अग्नी उपलब्ध झाला.ते अग्नीचे निर्माते आहेत.
हातात परशु घेऊन लढण्याच्या काळात त्यांनी मंत्रसिद्ध बाणांनी लढण्याचे संशोधन वास्तवात आणले व जगाला शस्त्राकडून अस्त्राकडे नेले.
अग्निहोत्री परशुराम
    भगवान परशुरामांनी समुद्र मागे हटवून निर्माण झालेल्या भूमीवर शेतीसाठी काही प्रयोग केले.कोकणात शेतीकरताना जमीन पालापाचोळा, गवत ,शेणखत आदींच्या सहाय्याने भाजली जाते याला भाजावण असे म्ह्णतात.शेती करताना आजहि या पद्धतीचा अवलंब केला जातो.कोकणाशिवाय इतरत्र भाजावण होत नाही असे सामान्यपणे मानले जाते. भगवान परशुरामांनी यज्ञ संस्कृती स्थिर केली त्यामुळे पर्यावरण उत्तम राहिले व सामान्य माणसाला अग्नी निर्मितीचे ज्ञानहि झाले. या यज्ञ संस्कृतीचाच एक भाग म्हणून अग्निहोत्राची परंपरा सुरु झाली आहे. आज केवळ भारतात नव्हे तर जगभर निरनिराळ्या धर्मातील व समाज व्यवस्थेतील दशलक्षावधी अग्निहोत्री दररोज नियमितपणे अग्निहोत्र करतात आणि भगवान परशुरामाने ही परंपरा सुरु केली यावर नितांत श्रध्दा ठेवून एकमेकाच्या संपर्कात असतात. भगवान परशुरामांनी अक्कलकोटजवळील शिवापुरी येथील परमभक्त श्री गजानन महाराज यांना दृष्टांत देऊन हे कार्य चालविण्याची आज्ञा केली व महाराजांनी यज्ञ संस्कृती जगभर पोचविली. श्रीक्षेत्र परशुराम येथेहि महाराजांनी मंदिराजवळ अग्नीमंदीर उभारले आहे.